परिचय
‘दर्शनिका विभाग’ (गॅझेटिअर डिपार्टमेंट) ३१ ऑक्टोबर १९६४ रोजी स्थापन करण्यात आलेला एक स्वतंत्र विभाग असून सध्या महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्यरत आहे. या विभागाला ब्रिटिश काळापासूनचा इतिहास लाभला आहे. विभागामार्फत इंग्रजी तसेच मराठीत गॅझेटिअरचे खंड प्रकाशित केले जातात.
‘गॅझेटिअर’ (Gazetteer) या शब्दाचा शब्दशः अर्थ भौगोलिक सूची किंवा भौगोलिक शब्दकोश असा होतो. यात केवळ एखाद्या प्रदेशाच्या भौतिक आणि नैसर्गिक वैशिष्ट्यांचे सर्वसमावेशक वर्णनच नसते, तर त्या जिल्ह्यात राहणाऱ्या लोकांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनाचा विस्तृत वृत्तांतही समाविष्ट असतो. यामध्ये भौतिक वैशिष्ट्ये, नैसर्गिक संसाधने, इतिहास, लोकांच्या रूढी-परंपरा व आचार-विचार, व्यापार, शेती, उद्योग, दळणवळण, जिल्हा प्रशासन, विविध सामाजिक संस्था आणि जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे यांसारख्या विषयांचा समावेश केला जातो.